मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत यशदा, पुणे येथे प्रशिक्षण घेत असलेल्या परराज्याच्या पथकाने बुधवारी (ता. ८) आडाचीवाडी (ता. पुरंदर) गावाला भेट देत गावातील विविध विकासकामांची पाहणी केली.
शासकीय निधीचा योग्य, पारदर्शक आणि लोकाभिमुख वापर करून ग्रामस्थांनी उभा केलेला विकास पाहून पाहणी पथकाने या गावाचे विशेष कौतुक केले. या कामांची कार्यपद्धती आणि गावकऱ्यांची एकजूट इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत पथकातील उपसंचालक संजयकुमार सिंग यांनी व्यक्त केले. अभियानाचे राज्य प्रवर्तक आदरणीय मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या सूचनेनुसार पथकाने गावाला भेट दिली.
या पथकामध्ये जिल्हा जनसंपर्क अधिकारी मनोज कुमार, सहाय्यक विकास अधिकारी राजवीर सिंह, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विजय बहादूर मौर्य, मधू चौधरी, बबली देवी, यशदा मार्गदर्शक वसंत राजुदकर आदींचा समावेश होता. यावेळी सरपंच सुवर्णा पवार, उपसरपंच मोहन पवार, सूर्यकांत पवार, प्रशांत पवार, अरविंद पवार, हनुमंत पवार, अभिजित पवार, सूरज पवार, अलका पवार, फुलचंद पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागतानंतर पथकाने ग्रामस्थांशी संवाद साधून गावांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती घेतली.
या पाहणी दौऱ्यात पथकाने गावात फेरफटका मारून जलव्यवस्थापन, पाणंद रस्ते, वृक्षारोपण, बोलक्या भिंती, स्वच्छता उपक्रम, व्यायामशाळा, नाना- नानी पार्क, स्मशानभूमी आदी कामांची पाहणी केली.
यशदा पथकातील सदस्यांनी नमूद केले की, आडाचीवाडी सारख्या लहान गावाने विकासाचा असा ठसा उमटवणे हे केवळ कौतुकास्पदच नाही, तर इतर गावांसाठी मार्गदर्शक ठरू शकते. त्यांनी ग्रामस्थांच्या सहभाग, नियोजन, आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी या तिन्ही पातळीवरील कामगिरीचे कौतुक केले. अनिल हिरास्कर यांनी आभार मानले.
