पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी गावाचा आदर्श; श्रमदान करून रस्ते उभारणीमध्ये हातभार.
जमिनीच्या वादावरून गावकीमधली भांडण सर्वश्रुत आहे. मात्र, गावकीने एकत्र येऊन आपापल्या जागा पानंद रस्त्यांसाठी सोडल्याचे आदर्श उदाहरण पुणे जिल्ह्यातील आडाचीवाडी या गावाने घालून दिले आहे. एकीकडे राज्य सरकारने पाणंदरस्त्यांना प्राधान्य दिलेल्या असताना जमिनीच्या खासगी मालकीमुळे त्यात अडचणी येत आहेत. मात्र, आडाचीवाडी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन स्वतःच्या जमिनी रस्त्यांसाठी देण्याबरोबरच श्रमदान करून रस्ते उभारणीमध्ये मोठा हातभार लावला असल्याची माहिती आडाचीवाडी गावाचे माजी उपसरपंच सूर्यकांत अनंतराव पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. पवार म्हणाले, सर्व प्रथम आम्ही गावकऱ्यांनी एकत्र बसन पाणंद रस्ते खुले करण्याबाबत एक बैठक घेतली. त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याची अडचण जाणून घेऊन, आपापसातील वाद दूर करून सर्वांनी एक मताने १५ पाणंद रस्ते खुले करण्याचे ठरवले. सदर सर्व १५ पाणंद रस्त्यांची रोव्हरद्वारे मोजणी करुन जिओ- रेफरन्सिंग करण्यात आले व त्याचे नकाशे तयार करण्यात आले. ग्रामसभेमध्ये सर्वानुमते ठराव करुन रस्त्यांची नोंद ७/१२ उताऱ्यावर घेणेकामी तहसिलदार पुरंदर यांना अहवाल सादर करण्यात आला. सदर सर्व रस्ते ज्या सर्व्हे नंबरमधून जातात त्या ४३२ जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर फेरफार घेऊन इतर अधिकारात रस्त्यासाठी ग्रामस्थांची वहिवाट अशी नोंद घेण्यात आली.

सदर रस्त्यांना महापुरुषांची नावे देण्यात आली, सदर महापुरुषांची नावे व सांकेतिक क्रमांक नमूद असलेली प्रशस्त कमान रस्त्याच्या सुरवातीस उभारण्यात येत आहे. रस्त्याच्या दुतर्फा रस्त्यापासून ३ फुट अंतरावर ३ मीटर अंतराने नारळ व जांभळाच्या एक हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. यामुळे रस्त्याच्या सौंदर्यात बाढ होते., निसर्ग संवर्धनास मदत (ऑक्सिजन) होते. रस्त्याची हद्द निश्चित झाली. झाडांच्या निगराणीसाठी २०० झाडांमागे १ अशा ५ बेरोजगार मुलांना मनरेगा अंतर्गत रोजगार देण्यात आला. वरील १५ पाणंद रस्त्यांपैकी १.५ कि.मी. लांबीच्या एका रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झालेले असुन नव्याने एकूण ३.५ किलोमीटर लांबीच्या ३ पाणंद रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरण काम नुकतेच सुरु करण्यात आलेले आहे.


